विकसित भारत विविभा २०२४ कॉन्क्लेव्हमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सहभागी होणार
गुरुग्राम येथे आदिवासी अभ्यासासह नाविन्यपूर्ण स्टार्टअपचे प्रदर्शन
नागपूर : श्री गुरु गोविंदसिंग ट्रायसेन्टेनरी विद्यापीठ गुरुग्राम (एसजीटी) येथे आयोजित विकसित भारत विविभा २०२४ कॉन्क्लेव्हमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आदिवासी अभ्यास तसेच इंक्युबेशन सेंटरच्या नाविन्यपूर्ण स्टार्टअपचे प्रदर्शन करण्यात आले. गुरुग्राम येथे १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयोजित कॉन्क्लेव्हमध्ये विद्यापीठाचे इंक्युबेशन सेंटर तसेच पदव्युत्तर इतिहास विभागाच्या वतीने स्टॉल्स लावण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमधील उद्योजक कलागुणांना वाव मिळावा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने इन्क्यूबीन फाउंडेशन तयार करीत इंक्युबेशन सेंटर सुरू केले आहे. या इन्क्युबीन फाउंडेशनच्या मध्य भारतातील प्रसिद्ध आणि सुसज्ज अशा फॅबलॅबच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्ष साकारत आहे. विद्यार्थ्यांनी मूर्तरूप दिलेले नाविन्यपूर्ण प्रकल्प, यंत्र तसेच नाविन्यपूर्ण स्टार्टअपचा स्थानिक तसेच इतर क्षेत्रातील उद्योजकांना लाभ होत आहे. याच इंक्युबेशन सेंटर मधील नाविन्यपूर्ण स्टार्टअपचे प्रदर्शन गुरुग्राम येथील विकसित भारत विविभा २०२४ कॉन्क्लेव्हमध्ये करण्यात आले.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसाच्या कार्यक्रमात इन्क्युबेशन केंद्रातील सदस्यांनी गुरुग्राम येथील कॉन्क्लेव्हमध्ये भेट देणारे विद्यार्थी, उद्योजक तसेच उदयोन्मुख स्टार्टअप यांना मौल्यवान मार्गदर्शन करीत अंतर्दृष्टी प्रदान केली. इन्क्यूबीन फाउंडेशनचे संचालक डॉ अभय देशमुख, इन्क्युबीन सेंटरचे व्यवस्थापक योगेश कुंते यांच्यासह विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
ट्रायबल स्टडीजच्या स्टॉलने वेधले लक्ष
गुरुग्राम येथील कॉन्क्लेव्हमध्ये पदव्युत्तर इतिहास विभागाच्या वतीने पारंपारिक ज्ञान प्रणाली (TKS) आणि स्थानिक समुदाय व त्यांच्या सभोवतालचे संबंध या विषयाच्या अनुषंगाने केलेल्या पोस्टर पेपर प्रेझेंटेशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांच्या नेतृत्वात पोस्टर पेपर प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. पारंपारिक ज्ञान प्रणाली आणि स्थानिक भौगोलिक समुदाय : संबंध आणि वारसा या पोस्टर पेपर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दर्शविण्यात आला.
निसर्गाशी घनिष्ठ संबंधासोबत विकसित झालेल्या नैसर्गिक संसाधनांविषयी संचित कौशल्य आणि ज्ञानाच्या पिढ्यांचे प्रतिनिधित्व कशाप्रकारे केल्या जाते हे या माध्यमातून दर्शविण्यात आले आहे. पारंपारिक ज्ञान प्रणालीमध्ये मौखिक इतिहास, जमीन व्यवस्थापन, कृषी तंत्र, औषधी ज्ञान आणि आध्यात्मिक विश्वास यासारख्या विविध पद्धतींचा समावेश असल्याची माहिती यातून देण्यात आली. पारंपरिक ज्ञान प्रणाली पर्यावरणीय संतुलन आणि सामाजिक-सांस्कृतिक संरक्षणास प्रोत्साहन देत असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
जीआयएस सारखी सहभागी पध्दती आणि साधनांद्वारे स्वदेशी भौगोलिक नकाशा तयार करून पारंपारिक प्रदेश, पवित्र स्थळे आणि संसाधन क्षेत्रे अधोरेखित करता येतात. यातून स्थानिक हक्कांचे संरक्षण सक्षम करता येईल आणि जैवविविधता संवर्धन करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे जागतिकीकरण, जमीन अधिकार समस्या आणि हवामान बदल यांसारख्या आव्हानांचा सामना करीत आधुनिक संवर्धन प्रयत्नांसह पारंपारिक ज्ञान प्रणाली एकत्रित शाश्वत विकासाचा मार्ग प्रशस्त करेल असे या पेपर पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दर्शविण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे, विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह विविध लोकांनी स्टॉलला भेट दिली.