एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसीय योग कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न
‘योगा फॉर हेल्थ अँड स्ट्रेस मॅनेजमेंट’ विषयावर मान्यवरांनी साधला संवाद
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठाच्या मानव संसाधन विभागाच्या वतीने एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय ‘योगा फॉर हेल्थ अँड स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाच्या मानव संसाधन विभागाच्या संचालिका डॉ टीना सहारन यांच्या हस्ते करण्यात आले.
मानव संसाधन विभागाच्या पुढाकाराने आणि योग विज्ञान विभाग एमजीएम विद्यापीठाच्या सहकार्याने तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये विविध विभागातील सुमारे ३५० कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. योग विज्ञान विभाग प्रमुख गंगाप्रसाद खरात (गुरुजी) यांनी दवाखान्यातील विविध कामाच्या पद्धतीमुळे येणारा शारीरिक आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी वक्रासन, योगमुद्रासन, वृक्षासन, ताडासन, मार्जरासन, त्रिकोणासन, सूर्यनमस्कार, हाताचे आणि पायाचे वेगवेगळे सूक्ष्म व्यायाम तसेच कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायाम यासोबत ध्यान आणि हास्यासन व संकल्प मंत्र घेऊन आपल्या सत्राचा समारोप केला. अशा पद्धतीने तीन दिवस योग अभ्यासक्रम घेऊन कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि नेहमी मानसिकरित्या संतुलित राहण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानव संसाधन प्रशिक्षण प्रमुख प्रशांत साखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत पांचाळ यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णालयाचे मानव संसाधन प्रमुख सुशांत कुलकर्णी, शिवाजी भालेराव,सोमनाथ निकम, विष्णू ताकधुणे यांनी विशेष परिश्रम घेतले.