एमजीएम विद्यापीठात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जन जागृती कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर, दि. २४ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय आणि डॉ. जी. वाय. पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात विद्यार्थ्यांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉ. श्याम महाजन, कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार, श्रीमती नंदिनी जाधव व राज्य बुवाबाजी संघर्ष समितीचे भगवान रणदिवे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना श्री. महाजन म्हणाले, १९८० साली डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सुरू केली. ही चळवळ विज्ञानवादी दृष्टिकोण बाळगत सर्वांना जे विज्ञानाने सिद्ध केले आहे, त्यावर विश्वास ठेवण्यास सांगते. निर्भय होत विवेकाने वागणे आवश्यक असून या मार्गावरून आपण मार्गक्रमित होण्यासाठी आजच्या या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोतदार आणि श्णदिवे यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागरूक केले. विज्ञानवादी दृष्टिकोण ठेवत अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा दिवा आपल्याला लावायचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यकारी समिती सदस्य नंदिनी जाधव यांनी ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३’ या कायद्यासंदर्भांत विद्यार्थ्यांना सविस्तरपणे माहिती दिली. यावेळी त्यांनी उदाहरणे देऊन समाजात कशाप्रकारे अंधश्रद्धा पसरवली जाते हे सांगितले. अंनिसकडून ९० दिवस हे जनजागृतीपर अभियान राज्यभर चालणार आहे. या कायद्यांतर्गत आजपर्यंत १२०० केसेस दाखल झालेल्या आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उषा शेटे यांनी केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ.रेखा शेळके यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून ५ संकल्प करून घेण्यात आले.