राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तुलसी जयंती समारोह
तुलसी लोक कवी – प्रो. गीता सिंह
नागपूर :(२४-८-२०२३)
तुलसी यांच्या कविता लोक कविता आहेत. त्यांच्या कवितांमधून लोक जीवनातील उच्च आदर्श दिसून येतात. त्यांच्या साहित्यात लोक जीवनाच्या विविध बाबी दिसून येत असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रो. गीता सिंह यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागात तुलसी जयंती समारोह पार पडला. यावेळी साहित्यिक प्रो. गीता सिंह मार्गदर्शन करीत होत्या.
तुलसी यांचे विचार भारतीयांच्या जीवनाचा आरसा असून त्यामध्ये भारतीय जीवनमूल्य अंकित असल्याचे प्रोफेसर गीता सिंह यांनी पुढे बोलताना सांगितले. तुलसी यांच्या कविता आपणास सामाजिक जीवनामध्ये उच्च मानवीय मूल्यांची शिकवण देत असल्याचे प्रोफेसर सिंह म्हणाल्या. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनात हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोज पांडे यांनी कार्यक्रमाची अध्यक्षता केली. तुलसी भारतीय समाजाचे एक असे नायक आहेत की त्यांनी जीवनातील उदात्त बाबींसह अनेक सामाजिक विसंगतींचे चित्रण केले आहे. त्यांच्या काव्यातून लोक जीवनातील विविध छटा दिसून येतात. आपणास तुलसी यांचे साहित्य वाचन त्यातील कवी मर्म लक्षात घेत करणे गरजेचे असल्याचे डॉ. पांडे म्हणाले. आभार व्यक्त करताना विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष गिऱ्हे यांनी तुलसी एक लोकशाहीवादी कवी असल्याचे सांगितले. त्यांच्या साहित्यातून जनजीवनातील यथार्थ चित्रीत झाला आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. लखेश्वर चंद्रवंशी यांनी केले. कार्यक्रमाला आयकर विभागाचे सहाय्यक निदेशक (राजभाषा) अनिल त्रिपाठी, विभागातील प्राध्यापकगण डॉ. सुमित सिंह, डॉ. गुंजनलाल लिल्हारे, डॉ. जागृती सिंह, प्रा. दामोदर द्विवेदी, प्रा. दिशांत पाटील, प्रा. रूपाली हिवसे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.