शरद पवार दंत महाविद्यालयात अँटी-रॅगिंग विरोधी जागृतीपर कार्यशाळा उत्साहात संपन्न
नवागत विद्यार्थ्यांना दिली सुरक्षित महाविद्यालयीन जीवनाची हमी
वर्धा : दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी (मेघे) येथील शरद पवार दंत महाविद्यालयात रॅगिंगविरोधी जागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत दंतशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना रॅगिंगबाबत सजग करीत महाविद्यालयीन कार्यकाळात विद्यापीठ व महाविद्यालयाच्या प्रशासनाद्वारे पूर्ण सुरक्षितता प्रदान करण्याची हमी देण्यात आली.
दंत महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेत डेंटल कॉन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य तथा धुळे येथील एसीपीएम दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अरुण डोडामणी यांनी मार्गदर्शन केले. रॅगिंग विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते, तसेच संस्थेची प्रतिमा मलिन करते, याची जाणीव त्यांनी यावेळी करून दिली. सर्वच विद्यार्थ्यांनी परस्पर आदरभाव, नैतिकता, सहिष्णुता, शिस्त, व्यावहारिक भान या मूल्यांचे पालन करीत ती स्वतःत, समूहात आणि संस्थेच्या परिसरात रुजवावीत, असेही डॉ डोडामणी म्हणाले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना रॅगिंगची लक्षणे ओळखता यावी यासाठी व्हिडीओ रील, नाटिका आणि चर्चात्मक संवाद याद्वारे जागृती करण्यात आली व रॅगिंगबाबतच्या कायद्याबाबतचे गंभीर परिणाम समजावून सांगण्यात आले. नवोदित विद्यार्थ्यांना रॅगिंग होत असल्याचे जाणवल्यास संस्थेच्या प्रशासनाशी संवाद साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. परस्परांचा सन्मान राखत आपल्या शैक्षणिक जीवनात कधीही रॅगिंगला प्रोत्साहन देणार नाही, अशी शपथ या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी घेतली.
कार्यशाळेला अधिष्ठाता डॉ मनोज चांडक, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ विद्या लोहे, उपअधिष्ठाता डॉ अलका हांडे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ अंजली बोरले यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ललितभूषण वाघमारे, कुलसचिव डॉ श्वेता काळे पिसूळकर, महासंचालक डॉ राजीव बोरले, डॉ संदीप श्रीवास्तव, संचालक डॉ तृप्ती वाघमारे यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.