यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दोन दिवशीय संशोधन निबंध लेखन कार्यशाळेचे आयोजन
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात येत्या दिनांक २६ व २७ नोव्हेंबरला दोन दिवशीय राष्ट्रीय स्तरावरील संशोधन निबंध लेखन कार्यशाळेचे ( Research Paper Writing – रिसर्च पेपर रायटिंग ) आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या प्रा राम ताकवले संशोधन व विकसन केंद्र तसेच स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंग यांच्या मार्फत ‘यश इन’ सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे.
विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कटिबध्द आहे. त्यासाठी शिक्षक – प्राध्यापक व संबंधित विद्यार्थी यांना सर्वांगीण शिक्षण – प्रशिक्षण देण्याचे ध्येय विद्यापीठ बाळगून आहे. त्या अनुषंगाने तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली ही दोन दिवशीय राष्ट्रीय स्तरावरील संशोधन निबंध लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. मंगळवार दि २६ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन होईल.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा राजेंद्र कुंभार हे ‘संदर्भ शैली आणि साहित्यचौर्य’ (Referencing Styles & Plagiarism) या विषयावर तर कुलगुरू प्रा संजीव सोनवणे हे ‘संशोधन निबंधाचे घटक’ (Components of Research Paper) या विषयी मार्गदर्शन करतील. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे संचालक प्रा व्ही बी गायकवाड हे ‘उद्धरण (एच इंडेक्स, 110 इंडेक्स), प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मासिके / जर्नल (स्कोपस/डब्ल्यूओएस) मधील प्रकाशन आणि त्या प्रकाशकांसोबतचा संवाद’ (Citations (H Index, 110 Index), Publications in Reputed International Journal (Scopus/WoS) & Communication with the Publisher) याविषयी संबोधित करतील.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई येथील एस एन डी टी विद्यापीठाच्या प्रा सारिका सावंत या ‘शोधनिबंध लिहिण्याची सिद्धता व तयारी’ (Mechanism of Writing Research Paper) याविषयी तर आयआयटी गांधीनगर येथील प्रा समीर सहस्त्रबुद्धे हे शोधनिबंध लेखनाचे नीतिशास्त्र (Ethics of Research Paper Writing) याविषयी मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात मुंबई येथील एस एन डी टी विद्यापीठाच्या प्रा ज्योती भाबळ या ‘शैक्षणिक लेखनात ज्ञान संसाधन केंद्रांचा वापर’ (Use of Knowledge Resource centers in academic writing) याविषयी माहिती देतील.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप होईल. सहभागींना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रा राम ताकवले संशोधन व विकसन केंद्र तसेच स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंगच्या संचालिका इमरटस प्रा डॉ कविता साळुंके यांनी दिली आहे.