एमजीएम विद्यापीठात महाराष्ट्र निवडणूक निकालांचा अन्वयार्थ या विषयावर सोमवारी व्याख्यानाचे आयोजन
ज्येष्ठ राजकीय अभ्यासक प्रा डॉ प्रकाश पवार मांडणार राज्य निवडणुकांचे विश्लेषण
छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर व एमजीएम विद्यापीठाचा जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या चाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार, दि २५ नोव्हेंबर २०२४ रोजी आचार्य विनोबा भावे सभागृह, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग येथे दुपारी १२:०० वाजता ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचा अन्वयार्थ’ या विषयावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व ज्येष्ठ राजकीय अभ्यासक प्रा डॉ प्रकाश पवार यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
२०२२ साली राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतरची ही विधानसभा निवडणूक; नुकतीच पार पडली आहे. दि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाचा अन्वयार्थ जनसामान्यांना यानिमित्ताने कळावा; यासाठी चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानास सर्वांना प्रवेश खुला असून जास्तीत जास्त अभ्यासक, विद्यार्थी व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.