डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला नॅकचे B++ मानांकन प्राप्त
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालीत डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाला राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) कडून २.८९ सी.जी.पी.ए सह B++ मानांकन प्रदान करण्यात आले आहे. १९८४ साली विना अनुदानीत तत्वावर स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने नॅक मुल्यांकन आणि मान्यता प्राप्त करण्यासाठी आपले पहिले प्रयत्न केले. नॅकच्या मूल्यांकन प्रक्रियेत महाविद्यालयाच्या विविध विभागांचे, संसाधनांचे, अध्यापन प्रणालीचे तसेच विद्यार्थ्यांसाठी आणि रूग्णांसाठी उपलब्ध सोयीसुविधांचे सखोल परीक्षण करण्यात आले. यासाठी ८ आणि ९ ऑक्टोबर २०२४ रोजी नॅक समितीने महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. समितीच्या अध्यक्षतेखाली असलेले प्रा. डॉ. सतीश कुमार भंडारी, प्रा. डॉ. प्राणवीर सिंह आणि प्राचार्य श्रुती मोहंती यांनी महाविद्यालयाच्या सर्व बाबींचे विस्तृत निरीक्षण केले. तसेच पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची वेगवेगळी सभा घेऊन त्यांनी महाविद्यालयाबद्दलची मते विचारली आणि त्यावर आधारित अहवाल नॅक मुख्यालयाला सादर केला.
नॅकने या सर्व किमान आणि अधिकतम निकषांची पूर्तता केल्यावर महाविद्यालयाला B++ मानांकन घोषित केले.
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि राष्ट्रीय आर्युविज्ञान परिषद, नवी दिल्ली यांचे मान्यता प्राप्त महाविद्यालय आहे. यशस्वी मूल्यांकन प्रक्रियेसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, सदस्य हेमंत काळमेघ आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वाचे ठरले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. पवन टेकाडे, नॅक समन्वयक डॉ. मिलींद जगताप, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रसाद तोरकडी, तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि नर्सिंग स्टाफ यांच्या कठोर परिश्रमाचा हा मान मिळाला आहे.
संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.