मिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न
बीड : मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निमित्ताने नव मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी महाविद्यालयाच्या परिसरात नागरिकांचा मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी चौकात बॅनर लावण्यात आले.
या उपक्रमाचा भाग म्हणून, विद्यार्थ्यांना ‘मी १००% मतदान करणारच’ असे ठरवून फ्लेक्स मध्ये स्वतःचे फोटो काढण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, दिनांक 18 नोव्हेंबर 2024, सोमवार रोजी सर्व विद्यार्थ्यांना, प्राध्यापक व कर्मचारी यांना सामूहिक शपथ घेण्याचे आयोजन करण्यात आले. या शपथविधीमध्ये मतदानाचे महत्त्व स्पष्ट करून, प्रत्येकाने निवडणूक प्रक्रियेत सक्रिय भाग घेतला पाहिजे, असा संदेश दिला.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस. एस., निवडणूक साक्षरता मंचचे सदस्य डॉ. शेख गफूर अहमद, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग, डॉ. शेख रफीक आणि प्राध्यापिका डॉ. शेख एजाज परवीन यांची उपस्थिती होती.
या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयाने मतदानाची जनजागृती आणि त्याच्या महत्त्वाबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक केले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ही महत्त्वाची पाऊले उचलली जात आहेत.