यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्ष शिष्टमंडळाची भेट

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास राज्य शासनाच्या राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाच्या (SLQAC – State Level Quality Assurance Cell) पाच सदस्यीय शिष्टमंडळाने भेट देवून विद्यापीठाच्या कामकाजाची पाहणी केली. विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरु केलेली ब्लॉकचेन क्यूआरकोड सिस्टम, होम असाईनमेंट तसेच निर्मिती केलेली पाठ्यपुस्तके, दृक्श्राव्य साहित्य आणि कृषी विज्ञान केंद्राची माती व पाणी परीक्षण पद्धत याचे या शिष्टमंडळाने कौतुक केले.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी या राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्ष  (SLQAC) शिष्टमंडळाचे विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत स्वागत केले. शिक्षण क्षेत्रातील दिग्गज विभूतींचा समावेश असलेल्या या शिष्टमंडळाचे नेतृत्व नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा प्रमोद येवले यांनी केले.

त्यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्टमंडळात पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व धोरणात्मक अभ्यास (डिफेन्स अँड स्ट्रटेजिक स्टडीज) विभागाचे प्रमुख व अनेक आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रकल्पांवर काम केलेले ज्येष्ठ प्राध्यापक विजय खरे, अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या संगणक शास्त्र व अभियंता विद्याशाखेच्या प्रा स्वाती शेरेकर, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. भालचंद्र वायकर व राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान (Rashtriy Uchchatar Shikshan Abhiyan – RUSA) – रुसाचे सल्लागार तथा राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाचे नोडल अधिकारी पांडुरंग बरकले यांचा समावेश होता. 

 या शिष्टमंडळा समवेत विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील व्यवस्थापन मंडळ सभागृहात मुख्य बैठक झाली. त्यात राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाचे (SLQAC) अध्यक्ष माजी कुलगुरू प्रा प्रमोद येवले यांनी सदर कक्ष निर्मितीची पार्श्वभूमी सांगितली. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा योजनेअंतर्गत मार्गदर्शक तत्वात नमूद केल्याप्रमाणे राज्यात शिक्षणाची गुणवत्ता राखून त्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच निरक्षण पद्धत सुलभ करण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्ष (SLQAC) गठीत करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

Advertisement

राज्यातील विविध विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये अपेक्षित असलेले मान्यता प्राप्त प्राचार्य/प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आवश्यक व पुरेसा प्राध्यापक वर्ग, परीक्षा निकालाचे आदर्श वेळापत्रक, नॅक मुल्यांकन, संशोधन कार्य, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम – २०१६ नुसार विद्यापरिषदेचे अधिकार व कर्तव्ये, अधिष्ठाता मंडळाचे अधिकार व कर्तव्ये, महाविद्यालयाचे शिक्षणविषयक लेखापरीक्षण याविषयीची देखील माहित प्रा प्रमोद येवले यांनी याप्रसंगी दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कामकाजाची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.

पाठोपाठ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी विद्यापिठाच्या एकूण कामकाजाविषयी मुद्देसूद माहिती दिली. त्यास पॉवर पॉइंट सादरीकरणाची जोड होती. त्यात विद्यापीठाचे स्थापनेपासुनचे कामकाज, यशोगाथा, विद्यापीठाने सध्या सुरु केलेलं नवीन शिक्षणक्रम, विविध व नवीन उपक्रम, आगामी योजना, विभागीय केंद्रांचे कामकाज याविषयीच्या माहितीचा समावेश होता. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या जीवनात कसा आमुलाग्र बदल घडून आला आहे. परिणामी महाराष्ट्राच्या प्रगतीत विद्यापीठाचे कसे योगदान आहे हे देखील कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी नमूद केले.

सदर राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाच्या (SLQAC) शिष्टमंडळ सदस्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गुणपत्रिकेसंदर्भात सुरु केलेली ब्लॉकचेन क्यूआरकोड सिस्टम, गृहपाठासाठीची होम असाईनमेंट पद्धत, विद्यापीठाने निर्मिती केलेली विविध शिक्षणक्रमांची पाठ्यपुस्तके व दृक्श्राव्य साहित्य तसेच कृषी विज्ञान केंद्राची माती व पाणी परीक्षण पद्धत याचे कौतुक केले. तसेच काही सूचना देखील मांडल्या. एकूणच या शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. सदर बैठकीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, डॉ हेमंत राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता व आश्वासन केंद्र ( सिका – CIQA – Centre for Internal Quality Assurance ) संचालक डॉ मधुकर शेवाळे यांनी केले. सदर बैठक यशस्वी होण्यासाठी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता व आश्वासन केंद्राचे सोमनाथ जाधव, डॉ धनंजय मुंडे, ज्योती पाटील, ज्योती मोरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page