नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभागाच्या वतीने ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य’ वर चर्चासत्र संपन्न
मानसशास्त्र विभागाचे ‘सुकून’ अंतर्गत आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभागाच्या वतीने सुकून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विभागातील सभागृहात ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य’ तसेच मानसशास्त्रातील विविध विषयांवर बुधवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे व प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभाग प्रमुख डॉ हिना खान यांनी भूषविले. ‘बात करने से ही होगा’ या थीमवर आयोजित चर्चासत्रात मानसोपचार तज्ञ डॉ रवी ढवळे, मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ रुबीना अन्सारी, मानसशास्त्रज्ञ डॉ सुमेधा वानखडे, रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल्स मुंबई लँग्वेज अँड स्किल कोर्सेसचे प्रमुख पंकज तावडे यांनी कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सोबतच नोकरी शोधत असताना किंवा नोकरीच्या ठिकाणी येणारा ताण व कामाच्या ठिकाणी होणारा छळ अशा विविध आणि महत्त्वपूर्ण विषयांवर वक्त्यांनी प्रकाश टाकला. मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ हिना खान, डॉ सुबोध बनसोड व अन्य शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती. चर्चासत्रानंतर गायक खुशाल भोयर यांनी सुरेल गीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.