राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘सुकून’ मानसिक आरोग्य जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
पदव्युत्तर शैक्षणिक मानसशास्त्र विभागाचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मानसशास्त्र विभागाच्या वतीने ‘सुकून’ मानसिक आरोग्य जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर व बुधवार, १३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान केले आहे. ‘अराजकतेवर शांततेने मात’ या टीमवर सुकून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्तम मानसिक आरोग्य लाभावे या दृष्टीने विभागाच्या वतीने सतत तिसऱ्या वर्षी देखील ‘सुकून’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विभागातील विद्यार्थी समितीने या कार्यक्रमाचे आयोजन मानसशास्त्र विभागाच्या सहकार्याने केले आहे. मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील पी व्ही नरसिंहराव वाचनालयासमोर हा कार्यक्रम होणार आहे.
यामध्ये आकर्षक स्टॉल्स लावले जाणार असून मानसशास्त्राशी संबंधित प्रदर्शन, पोस्टर स्पर्धा, परफॉर्मन्स, नुक्कड नाटक आणि विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. बुधवार दिनांक 13 नोव्हेंबरला सकाळी ११ वाजेपासून ‘बात करने से ही होगा’ यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यात मानसोपचार तज्ञ डॉ रवी ढवळे, मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ता डॉ रुबीना अन्सारी, मानसशास्त्रज्ञ डॉ सुमेधा वानखेडे सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग प्रमुख डॉ हिना खान यांनी केले आहे.