डॉ पवन वासनिक यांची राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागीय समन्वयक पदी निवड
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपपरिसर न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ पवन वासनिक यांची विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विभागीय समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एस सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात नावलौकिक मिळविले आहे. ‘सेवेद्वारे शिक्षण’ हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रेरणात्मक काम हे नेहमीच यशाला जन्म देत असते. या कार्याची दखल घेऊन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी यांनी डॉ पवन वासनिक यांची विभागीय समन्वयक पदी निवड केली.
डॉ वासनिक यांच्या कार्यक्षेत्रात हिंगोली येथील कै. बाबुरावजी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय, न्यु मॉडेल डिग्री कॉलेज, शिवाजी कॉलेज, संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे महाविद्यालय, आदर्श महिला महाविद्यालय आणि सेनगांव येथील तोष्णीवाल महाविद्यालय आदि महाविद्यालयाचा समावेश आहे.
डॉ पवन वासनिक यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, कुलसचिव डॉ डी डी पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एस सोळंके यांच्यासह सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ एस टी हजारे व महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.