‘आव्हान’ शिबिरासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा चमू रवाना
प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी दाखविली हिरवी झेंडी
नागपूर : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे आयोजित ‘आव्हान चान्सलर्स ब्रिगेड २०२४’ महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ आपत्ती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिरासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची चमू रवाना झाली आहे. महाराज बाग स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात प्रभारी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांनी बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी हिरवी झेंडी दाखवित चमूला रवाना केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सोपानदेव पिसे व विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांची उपस्थिती होती.
‘आव्हान चान्सलर्स ब्रिगेड २०२४’ या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आपत्ती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचे ७ ते १६ नोव्हेंबर, २०२४ दरम्यान संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे. पुणे एनडीआरएफचे संतोष सिंग यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या शिबिरामध्ये २३ विद्यापीठांमधील ६०४ मुले व ४४४ मुली असे एकूण १०४८ विद्यार्थी सहभागी होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातून २५ विद्यार्थ्यांची या शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये १५ मुले तर १० मुलींचा समावेश आहे.
या शिबिरात प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण एनडीआरएफ पुणे यांच्या चमूकडून देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना अग्निसुरक्षा, अग्निरोधक, जंगलाची आग, भूकंप, ज्वालामुखी, भुस्खलन, सर्पदंश, ढगफुटी, चक्रीवादळ, जैविक व रासायनिक आपत्ती, आण्विक आपत्ती, पुरग्रस्त व्यवस्थापन, रोप रेस्क्यू, प्रथमोपचार, त्सुनामी अशा विविध आपत्ती व्यवस्थापनाचे धडे प्रशिक्षणातून दिले जाणार आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या आपत्ती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय समारंभ १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सोपानदेव पिसे, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ, सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.