उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पूर्व प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबिराचे आयोजन
शिबिरातून ५६ विद्यार्थ्यांची दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड होणार
१२ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत शिबिराचे आयोजन
जळगाव : भारत सरकारचे युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय आणि रासेयोचे विभागीय संचालनालय पुणे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात दि १२ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम विभागीय राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबिर होत आहे. यामध्ये सात राज्यांमधील २०० विद्यार्थी सहभागी होत आहेत.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगना, गुजरात, दमन, दादरा-नगरहवेली, गोवा या सात राज्यातील १०० रा से यो विद्यार्थी व १०० रा से यो विद्यार्थिनी असे एकूण २०० रासेयो स्वंयसेवक या १० दिवसीय शिबिरात सहभागी होणार आहेत. याशिवाय दहा संघ व्यवस्थापक देखील सहभागी होतील. मंगळवार दि १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता सिनेट सभागृहात शिबिराचे उदघाटन उत्तराखंड राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ रणजित कुमार सिन्हा यांच्या हस्ते होणार असून कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, महाराष्ट्र शासनाचे रा से यो चे राज्य संपर्क अधिकारी डॉ निलेश पाठक यांची उपस्थिती असणार आहे.
या दहा दिवसात रोज सकाळी ९ ते ११:३० व दु. ३:०० ते ५:३० या कालावधीत पथ संचालनाचा सराव घेतला जाणार आहे. सकाळी योगा, दुपारी गट चर्चा आणि रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम अशी या शिबिराची दैनंदिनी असणार आहे. या शिबिरातून ५६ विद्यार्थ्यांची दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी दुपारी ३ वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शिबिरासाठी भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाने सहकार्य केलेले आहे. या शिबिरासाठी १५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अशी माहिती रासेयो संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी दिली.