यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सर्वांसाठी यशाची प्रशिक्षण भूमी – डॉ. बशीर हमाद शड्रच

नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे विद्यार्थी ते प्राध्यापक अशा सर्वांसाठी एक यशस्वितेची प्रशिक्षण भूमी आहे. या विद्यापीठाने आपल्या प्रगतीमधून एक पथदर्शी मार्ग तयार केलेला आहे, आपल्या स्थापनेपासून या विद्यापीठाने अल्पकाळात जेवढी प्रगती केलेली आहे तेवढी देशातील इतर कुठल्याही मुक्त विद्यापीठाने केली नाही, असे कौतुकास्पद उद्गार कॅनडा स्थित कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगचे कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया – कोल–सेमका (COL – Commonwealth of learning, – CEMCA Commonwealth Educational Media Centre for Asia, New Delhi) चे नवी दिल्ली येथील संचालक डॉ. बशीरहमाद शड्रच यांनी येथे काढले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारत सभागृहात Graduate Employability in ODL Institution (ऑनलाईन दूरस्थ शिक्षण संस्थेत पदवीधरांसाठीची रोजगारक्षमता) या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. यावेळी प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव श्री. दिलीप भरड, भारतातील इस्राईली दूतावासातील ए.आय. (AI) शिक्षणतज्ञ श्रीमती माया शर्मन, कोल–सेमकाच्या दिल्ली कार्यालयातील शैक्षणिक सल्लागार श्रीमती नबीला अता, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, अंतर्गत गुणवत्ता आणि आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. मधुकर शेवाळे, हे मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

यावेळी बोलतांना पुढे डॉ. शड्रच म्हणाले की पदवीधरांसाठीची रोजगारक्षमता दूरस्थ शिक्षण संस्थेच्या पार्स्व्भूमिवर बघत असतांना या संस्थांचे उद्दिष्ट्य, ध्येय धोरणे, कृती आराखडा, अपेक्षित निकाल यांचा देखील अभ्यास होणे गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाची रोजगाराशी सांगड घालणे सोपे ठरणार आहे. पारंपारिक शैक्षणिक संस्था व विद्यापीठांच्या तुलनेत ऑनलाईन दूरस्थ शिक्षण पद्धतीने शिक्षण देणाऱ्या मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक शुल्क हे परवडणारे आहे. त्यातूनच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षित करून रोजगाराभिमुख करणे सोपे जात असल्याचे मत डॉ. शड्रच यांनी व्यक्त केले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की प्रगतीचे शतक म्हणवणाऱ्या २१ व्या शतकातील आता २५ वर्षे होत आली आहेत. जगाच्या भारताकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्याअनुषंगाने आपण विचार करायला हवा. सन २०४७ पर्यंत विकसित भारत हे आपणा सर्वांचे ध्येय आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्यातील अडचणी व समस्यांवर मात करत आपल्याला नवीन तंत्र अवगत करावे लागणार आहे. पारंपारिक शेतीची पद्धत बदलावी लागेल, नोकरी व्यवसायाच्या नवीन संधी शोधाव्या लागतील. नवीन समस्या भेडसावू पाहत आहेत त्यांना त्या पद्धतीने सोडवावे लागणार आहे. शैक्षणिक व रोजगार संबंधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगचे कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया – कोल–सेमका (COL – Commonwealth of learning, – CEMCA Commonwealth Educational Media Centre for Asia, New Delhi) सोबत भरीव कार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संबंधित विषयावर प्रमुख वक्ते व उस्थित मान्यवर यांच्यात प्रश्नोत्तरसह चर्चा झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सेवा विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका सुभांगी पाटील यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता आणि आश्वासन केंद्राचे ( सिका ) संचालक डॉ. मधुकर शेवाळे यांनी केले. यावेळी विद्यापीठातील सर्व विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, शैक्षणिक सल्लागार, अधिकारी व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page