मिल्लिया महाविद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान उत्साहात साजरा
बीड : मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृति तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक /क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी याकरिता देशाच्या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात आला.दिनांक 13 ऑगस्ट 2023 पासून या अभियानास सुरुवात झाली. उपप्राचार्य डॉ. फैसल चाऊस यांच्या हस्ते सकाळी 7:30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या अभियाना अंतर्गत महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी आपल्या घरी दिनांक 13 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2023 या दरम्यान राष्ट्रध्वज फडकावला. तसेच तिरंगा सोबत सेल्फी काढून हर घर तिरंगा वेबसाईट वर अपलोड केली. तसेच दिनांक 14 ऑगस्ट 2023 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद ईलयास फाजील यांच्या हस्ते सकाळी 7:30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले व विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढली.
महाविद्यालयात दिनांक 15 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या सचिव श्रीमती खान सबिहा बेगम यांच्या शुभहस्ते सकाळी 07:30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी मिल्लिया कला,विज्ञान आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ.मोहम्मद इलियास फाजील, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस., कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सय्यद अब्दुल सत्तार,पत्रकार सी.आर.पटेल, प्रा.जावेद पाशा, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग,डॉ. शेख रफीक, डॉ. शेख एजाज परवीन,अलहाज सिद्दीकी, सय्यद मोईनुद्दीन, मुजतबा अहमद खान, सिद्दीकी अहमदुद्दीन, मुसा खान,हसीन अख्तर सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी -विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.