एमजीएम विद्यापीठात भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
छत्रपती संभाजीनगर : भारताचे ‘मिसाईल मॅन’ भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती एमजीएम विद्यापीठातील आंतरविद्याशाखा अंतर्गत असलेल्या शिक्षणशास्त्र विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली. आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई यांच्या हस्ते डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शिक्षण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अमरदीप असोलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना डॉ जॉन चेल्लादुराई म्हणाले, भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करीत असतोत. युवकांनी त्यांच्या जीवनाकडून प्रेरणा घेत आपले जीवन यशस्वी बनवावे.
उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर भाषणं केली. उपस्थित सर्वांनी एक तास वाचन करून डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी, गांधी अध्यासन केंद्राचे डॉ भागवत वाघ, निलेश बेडके, तत्त्वज्ञान विभागाचे डॉ रामेश्वर कणसे, क्रीडा विभागाचे डॉ दिनेश वंजारे, वुमन व जेंडर स्टडीच्या डॉ मंजुश्री लांडगे, संस्कृत विभागाच्या डॉ प्रज्ञा कोणार्डे, इंग्रजी विभागाचे डॉ इमरान पठाण तसेच शिवाजीराव गायकवाड, धनंजय गवळी यांच्यासह विविध विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षण शास्त्र विभागाच्या प्रा अनिता फुलवाडे यांनी केले.