राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन होणार शताब्दी महोत्सव
विद्यापीठ गीताचे देखील सामूहिक गायन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव समारंभ शुक्रवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीम बाग, नागपूर येथे दुपारी ३ वाजता आयोजित आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये हा समारंभ मोठ्या स्क्रीनवर ऑनलाईन दाखविला जाणार आहे. सोबतच सकाळी ११ वाजता विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव समारंभ भारताचे मा. उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीम बाग, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री. रमेश बैस, मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती हे राहणार आहे. विशेष अतिथी म्हणून श्री. एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. नितीन गडकरी, मा. केंद्रीय मंत्री परिवहन व महामार्ग विभाग भारत सरकार, श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. अजित पवार, मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य आदी उपस्थित राहणार आहे. या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित व स्वायत्त महाविद्यालयांमध्ये सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मोठ्या स्क्रीनवर शताब्दी महोत्सव समारोह दाखविण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. ऑनलाइन कार्यक्रम बघता यावा म्हणून विद्यापीठाने परिपत्रक काढून सर्व प्राचार्यांना समारंभाची ऑनलाइन लिंक पाठवली आहे. शताब्दी महोत्सवाची भव्यता लक्षात घेता वातावरण निर्मिती होण्याच्या दृष्टीने प्रत्येक महाविद्यालयात सकाळी 11 वाजता विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्याच्या सूचना विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी दिल्या आहे.