गोंडवाना विद्यापीठामध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न
वाचनामुळे माणूस समृध्द होतो – अधिष्ठाता डॉ श्याम खंडारे
गडचिरोली : विविध साहित्य प्रकारांच्या वाचनामुळे मानवी विचारांची मशागत होऊन वाचन संस्कृतीमुळे माणूस समृध्द होत जातो. असे मत मानव विज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ श्याम खंडारे यांनी व्यक्त केले.
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या औचित्याने गोंडवाना विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्र आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिना निमित्त विशेष ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक तथा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ रजनी वाढई, समाजशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ धनराज पाटील, इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख डॉ विवेक जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व मान्यवरांनी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
डॉ श्याम खंडारे म्हणाले, महामानवांचे व राष्ट्रपुरुषांचे कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहिलेले आहे. त्यांच्या विविधांगी वाचनामुळे ते समाजाला दिशा देण्याचे काम करीत राहिले. आज जरी वाचन संस्कृतीचे स्वरुप बदलले असले तरी तरुण पिढीने वाचनामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. विद्यापीठाचे हे ग्रंथ प्रदर्शन निश्चितच विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांसाठी लाभदायी ठरणार आहे.
डॉ रजनी वाढई आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हणाल्या, कुलगुरु डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे यांच्या मार्गदर्शनामुळे हे ग्रंथ प्रदर्शन यशस्वी झाले आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सदैव त्यांचे पाठबळ मिळत आहे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असले तरी ग्रंथांचे महत्त्व कमी होणार नाही. ग्रंथ नेहमीच जीवनाला वळण देतात असे नमूद करुन त्यांनी ग्रंथ प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या कथा, कादंबरी, कविता, ललित, लेख, आत्मचरित्रे, ऐतिहासिक, फोटोचरित्रात्मक तसेच दुर्मिळ ग्रंथांची अभ्यागतांना माहिती करुन दिली. ग्रंथ प्रदर्शनामध्ये आपल्या आवडीचे पुस्तक ठेवण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्राध्यापक, विद्यार्थी यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
प्रदर्शनाला विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी भेट देऊन विविध दुर्मिळ ग्रंथ हाताळायला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानस्रोत केंद्रातील सर्व कर्मचारी तसेच अध्यासन केंद्रातील सदस्य डॉ प्रफुल नांदे, अतुल गावस्कर, डॉ सुषमा बनकर आणि सहकारी अध्यापक यांचे सहकार्य लाभले.