एमजीएम विद्यापीठात राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांचे व्याख्यान संपन्न

सामान्य माणसांच्या सहवासातून विद्यार्थ्यांचे जीवन बदलेल – राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव

छत्रपती संभाजीनगर : सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील एका गावात जाऊन दहा दिवस सामान्य लोकांमध्ये राहणे आवश्यक आहे. पदवीचे शिक्षण, ग्रंथालय आणि पुस्तकांपेक्षा अधिक ज्ञान गावात आहे. जो विद्यार्थी आरक्षणाला विरोध करतो, त्याने गावातील दलित कुटुंबासमवेत राहावे. विद्यार्थ्यांनी गावातील लोकं जे काम सांगतील ते करत तेथील जीवनमान अनुभवणे आवश्यक आहे. या माध्यमातून आलेल्या अनुभवातून खऱ्याअर्थाने आपले डोळे उघडतील आणि आपले जीवन बदलेल, असा मला विश्वास असल्याचे प्रतिपादन राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी यावेळी केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्यावतीने विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृह येथे स्वराज इंडिया’चे संस्थापक, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांच्या संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, यादव यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, सुभाष लोमटे, प्रा एच एम देसरडा, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

पुढे बोलताना राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव म्हणाले, भारतामध्ये सार्वजनिक जीवनात असणारी माणसे त्यांच्यासमोर कोणताही विषय आला की, ते त्यावर व्यक्त होत असतात. आजकाल कोणाला विचार आणि चर्चा पाहिजे नाही, त्यांना केवळ बाईट हवी असते. आपल्याला एखाद्या विषयावर माहिती नसले तरी आपले भारतीय लोकं प्रत्येक विषयावर बोलत राहतात. कोणी असे म्हणणार नाही की, संबंधित विषयाबद्दल मला नाही. ही आपल्याकडे पडलेली एक परंपरा आहे. आपल्यासमोर आलेल्या प्रत्येक विषयावर व्यक्त झालेच पाहिजे असेही काही नसून एखादा विषय माहिती नसेल तर प्रांजळपणे आपण ते कबूल करणे आवश्यक असते.

Advertisement

जर्नालिस्ट आणि जनरलिस्ट असे दोन शब्द आहेत. जर्नालिस्टला सर्व गोष्टींची थोडी – थोडी माहिती असते. जनरलिस्ट असण्याचा फायदाही आहे आणि नुकसानही आहे. आपल्याला कोणत्याच गोष्टीची परिपूर्ण माहिती नसणे हे नुकसान असून समाजाला, देशाला  समजण्यासाठी आपल्या सामान्य दृष्टिकोणाची गरज असते. कोणताही समाज विद्वान लोकांमुळे चालत नसतो. त्यामुळे, जर्नालिस्ट हा जनरलिस्ट असणे आवश्यक आहे. गोष्टींना समजण्याचा दृष्टिकोण तयार होण्यासाठी जनरलिस्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. दृकश्राव्यमाध्यमे वरच्या स्थानी आणि वृत्तपत्रे त्यापेक्षा खाली अशा पद्धतीने समकालीन काळामध्ये माध्यमांची अवस्था झालेली आहे. यामध्ये पुन्हा इंग्रजी भाषा वरच्यास्थानी आणि बाकी भारतीय भाषा खालच्या स्थानी असे चित्र पाहावयास मिळते. इंग्रजी भाषेचा पत्रकार जेंव्हा प्रश्न विचारतो तेंव्हा त्याने आजचे वर्तमानपत्र तरी वाचले आहे की, कसे? असा प्रश्न माझ्या मनाला पडतो. त्याचप्रमाणे वृत्तपत्राच्या पत्रकाराने कधी त्याच्या जीवनात एखादे पुस्तक वाचले आहे की नाही? हाही प्रश्न माझ्या मनात येऊन जातो, असे श्री.यादव यावेळी म्हणाले.

यादव म्हणाले, माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. मात्र, सध्याची स्थिती पाहता लोकशाही समोरील प्रमुख अडचणी ज्या आहेत, त्यामध्ये सर्वात अग्रस्थानी माध्यमाचे नाव आहे. माध्यमे अशी नसती तर या देशात काही लोकांचा खून झाला नसता. आणि ही स्थिती आजची आहे असेही काही नाही. १०० वर्षापूर्वी भगत सिंग यांनी माध्यमांच्या भूमिकेबद्दल लिहिले आहे की, “माध्यमे ही देशाला जोडणारी असायला हवीत. मात्र, जितकेही माध्यमांचे मालक आहेत ते हिंदू – मुस्लिम यांच्यामध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत. समाजामध्ये द्वेष पसरविण्यासह समाजाला तोडण्याचे काम माध्यमे करीत आहेत. अशी माध्यमे असण्यापेक्षा ती नसलेली बरी.”

मलाही आज असे वाटते की, या देशात माध्यमे नसती तर आपण अधिक सभ्य असतो. आपल्या समोर येणारी बातमी, ही बातमी नसते तर त्याच्या पाठीमागे जे खूप काही असते ते कोणाला दाखवायचे नसते. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बातमी नसते तिथे असतात मते. विशेषत: जे शक्तिशाली आहेत त्यांची मते आपल्याला पहिल्या पानावर पाहावयास मिळतात. शक्तिशाली लोकं जी माहिती लपवू इच्छितात, जी माहिती प्रसिद्ध होऊ नये असे त्यांना वाटते ती माहिती, ती बातमी छापणे म्हणजे सत्य पत्रकारिता होय. या व्यतिरिक्त जे काही आहे आणि जे काही छापले जात आहे, ते सगळे जनसंपर्कात येते.

समकालीन काळात चर्चेत असणाऱ्या बाबा सिद्धीकी खून प्रकरण, जम्मू काश्मीर – हरियाणा निवडणूक, इस्रायल – इराण – पॅलेस्टाईन विवाद अशा विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विषयांवर राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा जैनब मिनाज यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page