धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ मार्गदर्शिकेचे निःशुल्क वितरण
‘एटापल्ली ते वॉशिंग्टन’चे अडथळे मार्गदर्शिका करेल दूर – प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली मार्गदर्शिका ‘एटापल्ली ते वॉशिंग्टन डीसी’ पर्यंत अडथळे दूर करेल, असे प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे माहिती व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन व निःशुल्क वितरणाचा कार्यक्रम शनिवार, दिनांक १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी पार पडला. केंद्र उद्घाटनिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ बोकारे मार्गदर्शन करीत होते.
दीक्षाभूमी परिसरातील सुंदरलाल चौक येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी भूषविले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर मानकर (भावसे), प्रमुख उपस्थितीमध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलसचिव डॉ अनिल हिरेखण, विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ पुरणचंद्र मेश्राम, डॉ मनोज शंभरकर (युएसए), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश दखणे यांची उपस्थिती होती.
उपक्रम सुरू करणे सोपे आहे. मात्र, सातत्याने २४ वर्षांपासून उपक्रम सुरू ठेवणे कठीण असून हा कार्यक्रम अद्वितीय आणि अवर्णनीय असल्याचे डॉ बोकारे पुढे बोलताना म्हणाले. अशा उपक्रमातून समाज मागील ६०-७० वर्षात विकसित झाला. मार्गदर्शिकेच्या माध्यमातून विविध योजना अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास अधिक वेगाने समाज विकसित होईल, असे डॉ बोकारे म्हणाले. इंग्लंडच्या संसदेत १९४५ मध्ये विस्टन चर्चिल यांनी देश चालविण्यात भारतीय अक्षम असून त्यांना प्रशासनाचा अनुभव नाही, असे भाकीत केले होते. ७०-८० वर्षात लोकशाही देश म्हणून उभाच राहिला नाही, तर जगात ५ वी आर्थिक महासत्ता बनत भारताने चर्चिल यांचे भाकीत खोटे ठरवले आहे.
संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्ये कागदावरच न राहता भारतीयांनी जीवनात उतरविली. जगाच्या पाठीवर परिवर्तन इतक्या संयमाने कोठेच घडले नाही. रशिया, चीन या ठिकाणी रक्तपताने परिवर्तन घडले. मात्र, कोणताही रक्तपात न करता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा मार्ग स्वीकारत परिवर्तनाचा नवीन संदेश दिला आहे. मार्गदर्शिकेचा उद्देश आज जाणविणार नाही. मात्र, १०० वर्षांनी जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या क्षणाची नोंद सुवर्ण अक्षरांनी होईल, असे डॉ बोकारे म्हणाले.
माहिती व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा संपूर्ण योजनांचा
अभ्यास, संकलन, पुस्तक तयार करीत विमोचन करणे सोपे नाही. याला फार मेहनत लागते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे कार्य करीत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांमध्ये साम्य आढळते.
कोणी अतिथी विद्यापीठाला भेट देतात तेव्हा या दोन महापुरुषांचा एकत्रित असलेला फोटो मी त्यांना आवर्जून दाखवितो, त्यातून प्रेरणा मिळत असल्याचे डॉ बारहाते म्हणाले. कुलगुरू म्हणून रुजू झाल्यानंतर अधिसभेत संविधान शिल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या उद्देशाने संविधान लिहिले आणि संत गाडगेबाबा यांनी दशसूत्री दिली. त्या मार्गाने चाललो तर त्यांचा उद्देश सफल होईल. या उपक्रमातून त्यांचे स्वप्न साकार करू शकतो तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ देखील अशा प्रकारची मार्गदर्शिका काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर मानकर यांनी ही मार्गदर्शिका म्हणजे विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय योजनांबाबत माहिती देणारे गुगल असल्याचे सांगितले. आसान्या फाउंडेशनच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्या २७ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आदी विविध भागात फिरत गौतम बुद्धाचा मार्ग सांगितला. गाडगेबाबांचे सचिव यांनी त्यांचे कार्य लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडगेबाबांनी ते जाळून टाकले. यामुळे या विषयावर अधिक संशोधन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. व्हिएतनाम येथे गेले असताना तेथील व्यक्तीने गौतम बुद्धाच्या देशातून आलो असल्याने कशाप्रकारे आदरतिथ्य केले याची माहिती त्यांनी दिली.
डॉ मनोज शंभरकर यांनी अमेरिकेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उभारलेला पुतळा, स्टडी सेंटर सुरू करण्याबाबत विविध संघटना करीत असलेल्या कार्याबाबत माहिती दिली. माजी कुलसचिव डॉ पूरणचंद्र मेश्राम यांनी संपूर्ण भारतात केवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठच अशा प्रकारची मार्गदर्शिका प्रकाशित करीत समाज परिवर्तनाचे कार्य करीत असल्याचे सांगितले. सामाजिक न्यायाची भूमिका घेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय शिक्षणातून देत नवीन पिढीला प्रेरित करण्याचे कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जगात सर्वात मोठे दान हे विद्यादान असल्याचे गौतम बुद्ध म्हणत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मार्गदर्शिका पुस्तक विद्यार्थ्यांसाठी लढाईचे शस्त्र म्हणून उपलब्ध करून दिले आहे. संविधानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे कार्य विद्यापीठ करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अनिल हिरेखण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्याकडून प्रेरणा घेत ही मार्गदर्शिका गोंडवाना विद्यापीठ देखील काढत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश दखणे यांनी कार्यक्रमाच्या आयोजना मागील भूमिका सांगितली. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या मार्गदर्शिका पुस्तकात असल्याने त्यांनी याचे वाचन करावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संचलन संघटनेचे महासचिव डॉ चंद्रमणी सहारे यांनी केले तर आभार दर्पण गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाला भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ ओमप्रकाश चिमणकर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ नितीन डोंगरवार, मराठी विभाग प्रमुख डॉ शैलेंद्र लेंडे, कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ राहुल खराबे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री राजेश नानवटकर, मनोज इंगळे, शरद बागडे, विलास बनसोड, धम्मा धाबर्डे, मनीष फुलझेले, आकाश भगत, शैलेश फुलझेले, मनोज धुर्वे, नरेश कांबळे, अजय शंभरकर, प्रफुल्ल भोवते, महेंद्र पाटील यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.