यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रारंभी माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील आदींनी पुष्पअर्पण केले. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करतांना कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिन आपण दरवर्षी साजरा करतो. खरं तर यामुळे आपल्याला आपल्या मनामध्ये राष्ट्रभावना जागृत करून, ती प्रज्वलीत करण्याची ही एक मोठी संधी असते, विशेष करून नव्या पिढीला.
राज्य घटनेने आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच कर्तव्य आणि जबाबदाऱ्या देखील दिल्या आहेत. यासाठीच आपण आपली संस्था, आपल्या देशाचे ध्येय धोरण, उद्दिष्टांसाठी झटलं पाहिजे. त्यामुळे राष्ट्र उभारण्यास नक्कीच मदत होईल. आजच्या दिवशी आपण एक संकल्प करण्याची गरज आहे. की, आपल्या देशातील छोटे छोटे नियम, शिस्त पाळली, तर आपण आपल्या देशाला तिसरी महासत्ता बनविण्यास मदत करू शकतो. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांनी केले. तर कुलसचिव दिलीप भरड यांनी कुलगुरूंना राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी विनंती केली.
कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच केंद्रीय गृह आणि खेल मंत्रालयामार्फत नेहरू युवा केंद्र, नाशिक आयोजीत ’15 व्या आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमासाठी’ आलेले आंध्रप्रदेश, ओरीसा, झारखंड आणि तेलंगाणा या राज्यातील 250 युवा आणि युवती उपस्थित होते. तसेच त्यांच्यासोबत आलेले 30 सीआरपीएफ जवान, नेहरू युवा केंद्राचे कमल त्रिपाठी आणि इतर अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठातील महाराष्ट्र शासनाच्या प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरचे विद्यार्थी देखील उपस्थित होते.