“बामु” विद्यापीठाचा ६४ व्या दीक्षांत समारंभाचे येत्या १३ जून रोजी आयोजन
व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
दीक्षांत समारंभात मार्च – एप्रिल व ऑक्टोबर – नोव्हेंबर -2023 यावर्षीच्या पदव्यांचे वितरण करण्यात येणार
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि १५) संपन्न झाली. व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात झालेल्या या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्यासह २० पैकी १८ सदस्य उपस्थित होते. ६४ व्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी १३ जून ही तारीख दिली आहे.

या सोहळ्यासाठीचे प्रमुख पाहुणे ठरविण्याचा अधिकार कुलगुरू यांना देण्याचा ठराव सर्वांनुमते घेण्यात आला. ६३ वा समारंभ कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय विद्यापीठ महासंघाच्या महासचिव डॉ पंकज मित्तल यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. तत्कालीन कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या कार्यकाळात २७ जून २०२३ रोजी हा सोहळा झाला होता. तर येत्या दीक्षांत समारंभात मार्च – एप्रिल व ऑक्टोबर – नोव्हेंबर -2023 यावर्षीच्या परीक्षांमधील पदवीधारकांना पदव्यांचे वितरण करण्यात येईल. तसेच वर्षभरातील वर्षभरातील पीएच डी धारकांनाही पदव्यांचे वितरण करण्यात येईल.
या बैठकीत राष्ट्रीय अधिमान्यता व अधिस्वीकृती परिषदेला (नॅक) विद्यापीठाचा स्वयं मूल्यमापन अहवाल (सेल्फ स्टडी रिपोर्ट) दाखल करण्यासही मान्यता देण्यात आली. गुरुवारी १६ विद्यापीठाच्या वतीने स्वयं मूल्यमापन अहवाल पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्वॅक) अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.