स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ४० कार्यशाळा
नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाद्वारे परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमधील ४० तालुका स्तरावर याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. दिपक पानसकर, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विकास सुकाळे, इत्यादी शिक्षण तज्ज्ञ द्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे. यामध्ये आवडीनुसार विषय निवडीचे स्वातंत्र्य आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या विद्याशाखा निवडीचे स्वातंत्र्य आहे. खेळ, संस्कृती, योगा, एन.एस.एस. व एन.सी.सी. इत्यादी सारख्या अन्य उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांक मिळणार आहे. समाजाबद्दल जाणीव जागृती होण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव या धोरणानुसार घेता येणार आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी कौशल्यावर आधारित अशा शिक्षण प्रणालीचा अंतर्भाव या धोरणामध्ये आहे. भारतातील ज्ञान शाखांचा अभ्यास करण्याची संधी यामध्ये उपलब्ध होणार आहे. मल्टिपल इंट्री व मल्टिपल एक्झिट ची सुविधा या धोरणामध्ये आहे. प्राप्त श्रेयांक संग्रहित ठेवून आवश्यक तेव्हा उपयोगात आणण्याची सोय या धोरणामध्ये आहे.
चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठांतर्गत सर्व संलग्नित पदव्युतर अभ्यासक्रमाचे महाविद्यालय व संकुले यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयांनी पदव्युतर अभ्यासक्रमाशी सुसंगत इंटर्नशिप व इतर बाबीसाठी आवश्यक असे किमान पाच सामंजस्य करण्यासाठीच्या सूचनाही या धोरणाद्वारे देण्यात आलेले आहेत. यासाठी महाविद्यालयांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा बाबतीत अवगत करावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासनातर्फे अथक परिश्रम घेण्यात येत आहेत.