राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा ३७ वा पदवीप्रदान समारंभ

राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले आणि विलास शिंदे यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानीत करण्यात येणार

राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा ३७ वा पदवीप्रदान समारंभ सोमवार दि. २९ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. आयोजीत करण्यात आला आहे. कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयासमोरील मंडपामध्ये होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस हे ऑन लाईन उपस्थित असणार आहेत. यावेळी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषि मंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी ट्रस्ट फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस (टास) चे अध्यक्ष, भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे माजी सचिव तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्म भूषण डॉ. आर. एस. परोदा हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी या समारंभासाठी विद्यापीठाचे विद्यापीठ कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले व नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली.

Advertisement
37th Graduation Ceremony of mpkv  presided over by Governor Ramesh Bais

पदवीदान समारंभात गेल्या वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण ६ हजार ८९५ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती रमेश बैस यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहेत. त्यात विविध विद्याशाखातील ६ हजार ५२२ स्नातकांना पदवी, ३०० स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर ७३ स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल. यावेळी यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page