कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ११.१५ वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न होत असून, या समारंभाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी पत्रकार परीषदेत दिली. या दीक्षांत समारंभासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे अध्यक्षस्थानी (ऑनलाईन) राहणार आहेत. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, नवी दिल्ली च्या सरचिटणीस डॉ. श्रीमती पंकज मित्तल यांचे दीक्षांत भाषण होणार आहे.
प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले की, एकूण १९ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी समारंभात नोंदणी केली आहे. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ७९९१ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ३३३८ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ४०४२ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे १२३५ स्नातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३९०, मुळजी जेठा महाविद्यालयाचे१२८८, प्रताप महाविद्यालयाचे ७१६, जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ७१२ अशा एकूण १९७१६ विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली जाणार आहे. गुणवत्ता यादीतील ११८ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. या मध्ये ७७ विद्यार्थिनी व ४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच एक सुवर्णपदक समान गुणांमुळे तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक स्वरुपात विभागून देण्यात आलेली आहेत. या समारंभात २०५ पीएच.डी. धारक विद्यार्थी देखील पदवी घेणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठ विषयी असलेली आत्मियता लक्षात घेवून व विद्यापीठाचे ब्रँडीग व्हावे या हेतूने या वर्षी सुध्दा डिग्री सर्टीफिकेट सोबत “माझं विद्यापीठ, माझं ज्ञानवैभव” असा मजकूर असलेले स्टिकर स्नातकांना दिले जाणार आहे. ते स्टिकर विद्यार्थ्यांनी आपल्या घरात प्रथमदर्शनी भागात लावणे अपेक्षित आहे. या पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव तसेच स्नातकाच्या आईचे नाव आहे. प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडच्या सहाय्याने मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे पदवी पडताळणी करता येईल. प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या होलोग्राम मुळे प्रमाणपत्राची सुरक्षितता अधिक वाढली आहे. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर स्नातकांसाठी डिग्री कोड देण्यात आला आहे. याशिवाय मोबाईल मॅसेजद्वारे देखील डिग्री कोड पाठविण्यात आला आहे.
स्नातकांनी पदवी ग्रहण करण्यासाठी सभारंभाच्या दिवसी प्राप्त झालेली डिग्री कोड, ओळखदर्शक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. स्नातकांना पदवी प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, याकरीता पदवी प्रमाणपत्राचे व उत्तरीय वाटप अभ्यासक्रमनिहाय खालील प्रमाणे प्रशासकीय इमारतीत काऊंटरवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दालन क्र. १२९ (कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय) खिडकी क्र.१ पीएच.डी. आणि एम. फील. सर्व विषय, दालन क्र.१०७ (सामान्य प्रशासन, आवक-जावक विभाग):- खिडकी क्र.०२ वर बी.ए. व एम.ए. इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत व उर्दू, दालन क्रमांक १०७ सामान्य प्रशासन (आवक-जावक विभाग) बी.ए. आणि एम.ए. (ह्युमॅनीटीज) इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संरक्षणशास्त्र, तत्वज्ञान, म्युझीक, मास कम्युनिकेशन, स्त्री अभ्यास, बी.एस.डब्लू., एम.एस.डब्लू., डी.पी.ए., बी.फ.ए., एम.फ.ए., दालन क्रमांक ११४ (प्रवेश व पात्रता विभाग) बी.एस्सी. – सर्व विषय, दालन क्रमाक ११४ (प्रवेश व पात्रता विभाग) एम.एस्सी.-सर्व विषय, दालन क्रमांक १११ (ई-सुविधा केंद्र) (प्रवेश व पात्रता विभागाशेजारील) बी.कॉम., एम.कॉम., आणि सर्व मॅनेजमेंट कोर्सेस, दालन क्रमांक ११४ (प्रवेश पात्रता विभाग) बी.ई.- सर्व विषय, बी.टेक. – सर्व विषय, एम. टेक.-सर्व विषय, बी.व्होक. – सर्व सर्व विषय, दालन क्रमाक १२९ (कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय) लॉ, मेडीकल आणि फार्मसी, दालन क्रमांक १११(ई सुविधा केंद्र) (प्रवेश व पात्रता विभागा शेजारील कक्ष) बी.एड.आणि एम.एड. एम.ए.-एज्युकेशन.
दीक्षांत समारंभ संपल्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जे विद्यार्थी या समारंभास उपस्थित राहणार नाहीत अशा गैरहजर विद्यार्थ्यांना १ मार्च ते ३० मार्च पर्यंत विद्यापीठाच्या पदवी प्रदान विभागातून कार्यालयीन वेळेत ओळखदर्शक पुरावा दाखवून पदवी प्रमाणपत्र घेता येईल. जे विद्यार्थी एक महिन्यापर्यंत विद्यापीठात येऊन त्यांचे प्रमाणपत्र घेऊन जाणार नाहीत त्यांचे प्रमाणपत्र एप्रिल पासून टपालाव्दारे (स्पीड पोस्ट) टप्प्या-टप्प्याने पाठविण्यात येणार आहे.
याबाबतचा सर्व तपशील विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. समारंभस्थळी सकाळी ठिक ८ वाजता विद्यार्थी व निमंत्रितांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. समारंभात सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट, पांढऱ्या रंगाची पँन्ट किंवा पांढऱ्या रंगाचा नेहरु शर्ट आणि पांढऱ्या रंगाचे चुस्त तर विद्यार्थिंनीसाठी लाल किनार असलेली पांढरी साडी, लाल रंगाचे ब्लाऊज किंवा लाल रंगाचा कुर्ता (कमीज) व पांढऱ्या रंगाची सलवार अशा पोशाखात उपस्थित रहावे. दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना विशिष्ठ पोशाखाची सक्ती नाही मात्र भारतीय संस्कृती व परंपरेचा सन्मान राखत नेटका पोशाख करुन उपस्थित राहणे अपेक्षित आहे.
तसेच सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (live) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांनाही बघता यावे यासाठी महाविद्यालयांनी व्यवस्था करावयाची आहे. या बाबत सर्व महाविद्यालयांना सूचना निर्गमीत केलेल्या आहेत.
विद्यापीठाचे इन्क्युबेशन सेंटर केसीआयआयएल तर्फे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलल्या स्टार्टअप उत्पादनांचे प्रदर्शन दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने या वर्षी भरविले जाणार आहे. यामध्ये १२ स्टार्टअप सहभागी होतील.
या पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील उपस्थित होते.