अमळनेरच्या प्रताप तत्वज्ञान केंद्रात दुसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्धाटन
अमळनेर : तरुण पिढीतील नवलेखकांनी कायम अस्वस्थ राहायला हवं. कारण अवस्थता ही कलावंतांची प्रेरणा असून त्यातूनच अस्सल कलाकृती निर्माण होत असते असे प्रतिपादन युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी प्रा. ऐश्वर्य पाटेकर यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने अमळनेरच्या प्रताप तत्वज्ञान केंद्रात दुसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्धाटन करतांना पाटेकर बोलत होते. या संमेलनात १८० विद्यार्थी सहभागी झाले. कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य राजेश पांडे, कबचौउमविच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रा. शिवाजी पाटील, आयोजन समिती अध्यक्ष तथा व्य. प. सदस्य नितीन झाल्टे, ॲड. अमोल पाटील, अधिष्ठाता प्रा. जगदीश पाटील, केंद्राचे मानद संचालक प्रा. दिलीप भावसार यांची यावेळी उपस्थिती होती. प्रा. ऐश्वर्य पाटेकर म्हणाले की, युवा पिढीच्या साहित्याला वाव मिळण्याची गरज आहे. साहित्यात सिनेमा प्रमाणे एका रात्रीत स्टार होता येत नाही, त्यासाठी जगण द्यावे लागते. दुदैवाने माणसाला आपली मुळं कळलेली नाहीत. अवस्थता ही कलावंताची प्रेरणा असली पाहिजे. अपयश, संघर्ष पचवावा लागतो. भाषा कोणतीही असो पण काळजातील भाषा बोलावी असे आवाहन करतांना प्रा.पाटेकर यांनी पुस्तकाशी तरुणांनी जोडून घेतले तर समृध्द समाज निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करुन लेखकांनी लेखनाचा धर्म पाळावा असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा. माहेश्वरी यांनी कला हे अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम असून याव्दारे समाजात ओळख, पुरस्कार आणि त्यातून रोजगारही मिळतो असे सांगत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या सगळया गोष्टींचा विचार केला गेला आहे असे सांगितले. राजेश पांडे यांनी तरुण पिढीला संधी दिली तर योग्य फायदा ही पिढी घेते, त्यामुळे विद्यापीठाने हा उपक्रम सुरु केल्याबद्दल विद्यापीठाचे कौतुक केले. पुढचा काळ हा ज्ञानाचा आहे त्यामुळे संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी केले. प्रा. दिलीप भावसार यांनी आभार मानले. या विद्यार्थी संमेलनात १८० विद्यार्थी सहभागी झाले होते.
उदघाटनानंतरच्या सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात लेखक नामदेव कोळी यांनी त्यांच्या शेत मजूर ते साहित्यिक या प्रवासातील संघर्षाचा काळ विद्यार्थ्यांसमोर मांडला व त्यांची पुरस्कार प्राप्त कविता तो शेत मजुराचा पोरगा आहे… सादर केली. चित्रकार राजू बाविस्कर यांनी देखील नोकरी करीत असतांना देखील मनातील भावनांना चित्रांव्दारे मांडून त्यांच्या काळया निळ्या रेषा या पुरस्कार प्राप्त पुस्तकाची माहिती दिली. लेवा गणबोली संदर्भातील माहिती व आपल्या मातृभाषेतून विद्यार्थ्यांनी साहित्याची मांडणी करावी असे व. पु. होले यांनी सांगितले. अथर्व पब्लिकेशन्स चे संचालक युवराज माळी यांनी सहायक ते प्रकाशन संस्थेचा मालक याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या संमेलनाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शोभणे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रा. शोभणे म्हणाले की, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच वय हे परीस ओळखण्याचं असतं. तुम्हाला तूमचा परीस गवसला तर तुमच्या आयुष्याच तूम्ही सोन करु शकता. महाविद्यालयीन तरुणांनी अनेक पुस्तकांच वाचन करावे. एखाद्या घटनेतून आपल्याला जाणवणारी अवस्थता व त्यातील घालमेलमधून साहित्याची निर्मिती होत असते. ती मांडणे, लिहीणे गरजेचे आहे. प्रत्येकाने व्यक्त होणे महत्वाचे आहे, व्यक्त होतांना विचारांची झालर, सामाजिक प्रश्न, भावना त्यातून सुंदर कलाकृती तयार होत असते. समाजमाध्यमांबाबत बोलतांना ते म्हणाले की, मोबाईलचा वापर किती करावा हे निश्चित करुन समाज माध्यमातून महत्वाच्या बाबीं योग्य त्या प्रमाणात जरुर पहाव्यात त्यांचा अतिरेक करु नये असे आवाहनही प्रा.शोभणे यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी साहित्यिक नरेंद्र पाठक यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उदघाटनानंतरच्या सत्रात स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा आणि बोली भाषा सादरीकरण स्पर्धा झाली. ४५ कवींनी काव्यवाचन आणि १५ विद्यार्थ्यांनी बोली भाषा सादरीकरणात भाग घेतला. या संमेलनाला विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अमोल मराठे, दिनेश खरात, नितीन ठाकूर, सुरेखा पाटील, संचालक प्रा. आशुतोष पाटील, विविध लेखक, साहित्यिक, कवी, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.