भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २५ वा पदवी प्रदान समारंभ संपन्न
युवकांनी आता देशासाठी संपत्तीचे निर्माते बनावे – राज्यपाल रमेश बैस
पुणे : आज भारताकडे असणारी युवाशक्ती हे देशाचे सर्वांत मोठे बलस्थान आहे. त्यामुळेच अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागलेले आहे. आपण सारे काही करू शकतो या भूमिकेतून आपल्या तरुणांनी आता संपत्तीचे निर्माते बनण्याची गरज आहे. असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २५ व्या पदवी प्रदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करतानाते बोलत होते.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा डॉ शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास कुलगुरू डॉ विवेक सावजी, प्र-कुलगुरू डॉ विश्वजीत कदम, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ अँथनी रोज, कुलसचिव जी जयकुमार, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या पदवी प्रदान समारंभात ५८५८ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. ५६ विद्यार्थ्यांना पीएच डी ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रत्येक विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर आणि पदवी परीक्षांमध्ये सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल म्हणाले, विकसनशील देशाकडून विकसीत राष्ट्र ही नवी ओळख प्राप्त करण्यासाठी भारतही आता मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. त्या प्रयत्नांमध्ये युवाशक्तीने आपल्या संपूर्ण क्षमतेसह सहभागी व्हावे. आजच्या घडीला जपान, जर्मनी अशा विविध देशांचे प्रतिनिधी जेव्हा मला भेटतात तेव्हा त्या साऱ्यांचीच चिंता एकच आहे ती म्हणजे त्यांच्याकडे युवाशक्तीचे पाठबळ नाही. भारताकडे मात्र युवा शक्ती मोठी आहे. ते लक्षात घेऊन आपल्या उच्च शिक्षित युवा शक्तीने परिवर्तनाच्या यात्रेत सहभागी व्हायला हवे. आज पुण्यासारख्या शहराचा आॅक्सफर्ड आॅफ द इस्ट म्हणून गौरव केला जातो तो येथील विद्यापीठांमध्ये होत असलेल्या समर्पित प्रयत्नांमुळेच. आपल्याकडील जी मुले अमेरिका, कॅनडा, इंग्लंड अशा ठिकाणी शिकायला जातात ते ग्लोबल शिक्षण आपल्या इथेच विश्वविद्यालयांतून मिळायला हवे. भारतातच आज रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्याने परदेशात जाऊन नोकऱ्यांचा शोध घेणाऱ्या तरुणांची संख्या कमी होते आहे. भारतात आपल्या आयआयटीचे नवे कँपस उभे राहत आहेत. इतर देशांनाही आपल्याकडील शैक्षणिक ज्ञान हवे असल्याने आपण तिथे आय़आयटी स्थापन करावे म्हणून सामंजस्य करार करण्यास अन्य देश इच्छुक आहेत. आपले देशाप्रती, समाजाप्रती असणारे सामाजिक योगदान लक्षात घेऊन भारती विश्वविद्यालयाने विकास घडवून आणण्यासाठी काही गावे दत्तक घ्यावीत असे आवाहनही राज्यपालांनी केले.
कुलगुरू डॉ सावजी म्हणाले, तंत्रज्ञानात झपाट्याने होणारे क्रांतिकारी बदल, परदेशी विद्यापीठांशी असलेली स्पर्धा, गोष्टी कालबाह्य होण्याचा वाढलेला वेग अशा अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारती विद्यापीठ सज्ज आहे. जिद्द आणि महत्वाकांक्षा याच्या बळावर डॉ.पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवला.भारती विद्यापीठाने गेल्या साठ वर्षात देशाच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात दिलेले योगदान मोलाचे आहे. विकसित भारताचे व्हीजन भारताचे डाॅक्युमेंटेशन करण्यासाठी देशभरातून ज्या १५३ विद्यापीठांची निवड केली आहे त्यात भारती विद्यापीठाचा समावेश आहे याचा आम्हाला विशेष आनंद आणि अभिमान आहे.
टाॅपर आलेल्या मुलींचे विशेष कौतुक
आज दीक्षांत समारंभात सुवर्णपदक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक होती याचा आवर्जून उल्लेख राज्यपालांनी केला. ते म्हणाले, आज मुली शिक्षणात पुढे येत आहेत ही चांगली बाब आहे. तरीही त्यांच्या पुढील अडचणी खूप असतात. मुलांच्या तुलनेत घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्या शिक्षण घेतात. असे असताना जेव्हा या मुली टाॅपर येऊन सुवर्णपदक मिळवतात तेव्हा त्यांचे विशेष कौतुक करायला हवे.