डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरचा २० वा वर्धापन दिन उत्साहात

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरण्याच्या मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणार

व्यवस्थापन परिषद बैठकीत एकमताने ठराव मंजूर

रिक्त पदांचा आकडा ४०० वर

प्रा वेदकुमार वेदालंकार यांना जीवनसाधना पुरस्कार प्रदान

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आस्थापनेवरील शिक्षकेत्तर कर्मचारी यांची रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषद बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विसावा वर्धापनदिन शुुक्रवारी (दि १६) विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

माजी कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे, कुलगुरू प्रा डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते प्राचार्य डॉ वेदकुमार वेदालंकार यांना जीवन साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रकुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर आदी.

यावेळी प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांना जीवनसाधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. धाराशिव उपपरिसराची १६ ऑगस्ट २००४ रोजी स्थापना झाली. तेव्हापासून दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली उपपरिसरच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रकुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर , व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ अंकुश कदम, बसवराज मंगरूळे, उपपरिसर संचालक डॉ प्रशांत दीक्षित आदींची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

सर्व प्रथम विद्यापीठ उपपरिसरातील हिरवळीवर कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते विद्यापीठाचा ध्वज फडकविण्यात आला. त्यांनतर माजी प्राचार्य तथा जेष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ञ डॉ वेदकुमार वेदालंकार यांना जीवनसाधना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप, काशिनाथ देवधर, नितीन जाधव, वित्त व लेखाधिकारी सविता जंपावाड, डॉ दत्तात्रय भांगे, अधिष्ठाता प्रा डॉ संजय साळुंके, डॉ वैशाली खापर्डे, डॉ भगवान साखळे, प्राचार्य डॉ गौतम पाटील, डॉ भारत खंदारे, दत्तात्रय भांगे, डॉ व्यंकट लांब, डॉ अपर्णा पाटील, अधिसभा सदस्य डॉ भास्कर साठे, देविदास पाठक, नाना गोडबोले आदी उपस्थित होते. तसेच माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, स्वातंत्र्यसैनिक बुबासाहेब जाधव, प्राचार्य डॉ रमेश दापके, डॉ अशोक मोहेकर, डॉ जयसिंगराव देशमुख, डॉ हरिदास फेरे, डॉ प्रशांत चौधरी, डॉ सुनील पवार, डॉ गुलाब राठोड हे कार्यक्रमास उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रकुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे यांनी केले. जीवनसाधना पुरस्कार मानपत्र वाचन डॉ महेश्वर कळलावे यांनी केले. सत्कारमूर्ती डॉ वेदकुमार वेदालंकार यांनी म्हटले कि जीवन साधना, अलौकिक कार्य अध्यात्मिक प्रेरणेने केले आहे. या कार्याची नोंद घेऊन विद्यापीठाने पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. छावा ग्रंथाचे भाषांतर हिंदीमध्ये आठ महिन्यात केले. दिव्य प्रेरणेने सर्जनशील कार्य करणे शक्‍य झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुरस्कार देऊन गौरव केला, त्याबद्दल मी धन्य आहे.

Advertisement

अण्णाभाऊ साठे यांच्या तीन कादंबऱ्या व वीस कथांचा हिंदीत अनुवाद केला. समारंभाचे प्रमुख अतिथी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा डॉ माणिकराव साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. या सत्काराच्या कार्यक्रमाने भारावून गेलो आहे, असे त्यांनी म्हटले. सत्कारमूर्ती डॉ वेदकुमार वेदालंकार यांना शतकोत्तर कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यापीठ उपपरिसरातील सर्व शैक्षणिक विभागाचे कार्य प्रशंसनीय आहे. जगात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. वीस वर्षांत विद्यापीठ उपपरिसराची प्रगती अभिमानास्पद झालेली आहे. एखाद्या शिक्षण संस्थेचे मूल्यमापन किती विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले आहेत यावर अवलंबून आहे. त्यांनी विद्यापीठ उपपरिसरातील रसायनशास्त्र विभागाचे विशेष कौतुक केले.

नेट, सेट परिक्षेत रसायनशास्त्र विभागातील ८० विद्यार्थी आजपर्यंत उत्तीर्ण झाले आहेत. स्टेम सेल मधुन उपचारासाठी किडनी, ह्रदय तयार करता येते. लोकांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे हे विद्यापीठाचे काम आहे. एकविसाव्या शतकात देश महासत्ता बनत आहे. आपली सर्वात मोठी शक्ती विविधता आहे. जगात सगळ्यात गरीब लोक आपल्या देशात आहेत. कृषी संस्कृतीतून आपण ज्ञान संस्कृतीकडे प्रवास करीत आहोत. विद्यापीठाने चांगले मनुष्यबळ निर्माण केले पाहिजेत. भविष्यातील शिक्षण कसे देणार आहोत, याचाही विचार केला पाहिजे. माहिती देणे, शिक्षण देणे, नाविन्यपूर्ण पद्धत विकसित करणे, या पद्धतीने शिक्षण दिले पाहिजे. बहु विद्याशाखीय शिक्षणाच्या माध्यमातून जगासमोर असलेले प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ माणिकराव साळुंखे यांनी केले.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ विजय फुलारी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी हित, कर्मचारी हित, जपणे हे संस्थेचे महत्वाचे कार्य आहे. एनआयआरएफ मूल्यमापनात देशातील राज्य विद्यापीठामध्ये, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ४६ वा क्रमांक आला आहे. यश सांघिक प्रयत्नामुळे प्राप्त झाले आहे. कोणतीही आपत्ती इष्ट आपत्तीत रुपांतर करता येते. सत्कारमूर्ती डॉ वेदकुमार वेदालंकार यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भातील अनुवादित साहित्य साहित्य विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्याची ग्वाही, त्यांनी दिली. कार्याच्या माध्यमातुन प्रशासकीय आणि गुणवत्तेची शिस्त लावणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरु प्रा डॉ विजय फुलारी यांनी केले. सत्कारमूर्ती डॉ वेदकुमार वेदालंकार यांनी त्यांची साहित्य संपदा ज्ञानेश्वरी मान्यवरांना भेट दिली.

सुत्रसंचालन डॉ विक्रम शिंदे व डॉ महेश्वर कळलावे यांनी केले. कुलसचिव प्रा डॉ प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले. या सोहळ्यास उपपरिसरातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, बहुसंख्येने उपस्थित होते. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी करणार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आस्थापनेवरील शिक्षकेत्तर कर्मचारी यांची रिक्त पदे भरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक शुक्रवारी (दि १६) धाराशिव उपपरिसर येथे घेण्यात आली. या बैठकीस सदर प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या बैठकीस प्रकुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सन २००९ मध्ये राज्यशासनाने वर्ग एक ते चार असे एकूण ७७७ पदांचा आकृतिबंध मंजूर केला आहे. यातील ३७७ पदे सध्या कार्यरत असून सुमारे चारशे पदे रिक्त आहेत.

सदर पदे भरण्यास राज्य शासनाने मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विद्यापीठ प्रशासन सदर मागणीचा प्रस्ताव लवकरात लवकर राज्य शासनाकडे पाठविणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page