उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत रू २० कोटी मंजूर
जळगाव : प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला पायाभूत व शैक्षणिक विकासासाठी २० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. दरम्यान प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियानाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी रोजी डिजीटल लाँचींग व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे केले जाणार असून त्याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या सर्व घटकांसाठी केले जाणार आहे.
रुसा योजनेचे आता प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियानात रूपांतर करण्यात आले असून देशभरातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना बळकटी प्राप्त व्हावी यासाठी या योजनेअंतर्गत १२,९३६.१० कोटी रूपये दिले जाणार आहेत. देशभरातील २६ विद्यापीठांना प्रत्येकी १०० कोटी तर ५२ विद्यापीठांना प्रत्येकी २० कोटी रूपये जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला २० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यामध्ये बांधकामासाठी (अत्याधुनिक विश्लेषणात्मक साधन सुविधा, वर्ग खोली संकुल) यासाठी ९.२८ कोटी तर नुतनीकरण व सुविधा (माहिती तंत्रज्ञान सुविधा, सेमिनार हॉल, ऑनलाईन परीक्षा केंद्र, ई-कंटेटसाठी स्टुडिओ, दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा) यासाठी ३.३५ कोटी तर उपकरणांसाठी ५.६५ कोटी आणि कौशल्य विकास, (समुपदेशन केंद्र, विद्यार्थ्यांसाठी संवेदना जणजागृती कार्यक्रम, कौशल्य कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र ) यासाठी १.७० कोटी असा एकूण २० कोटी रूपयांचा प्रस्ताव या योजनेसाठी विद्यापीठाने दिला होता. तो प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासाला गती मिळणार आहे.
दरम्यान एकूणच उच्च शिक्षणाच्या संस्थांना आर्थिक बळकटी देत असतांना काही योजना भारत सरकारकडून जाहीर होणार असून त्याचे डिजीटल लाँचींग मंगळवार दि. २० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार केले जाणार आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे ते शैक्षणिक घटकांशी संवाद साधणार आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हे थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा अधिसभा सभागृहात करण्यात आली असून मंगळवारी सकाळी ११ वाजता सर्व लोकप्रतिनिधी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.