आंतरराष्ट्रीय परिषदेत नागपूर विद्यापीठाच्या प्रतीक्षा ब्रम्हे हिच्या नावीन्यपूर्ण संशोधनास प्रथम क्रमांक
विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागाला मिळाला बहुमान
नागपूर : मथुरा येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च जीएलए युनिव्हर्सिटी येथे ४ व ५ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील विद्यार्थिनी प्रतीक्षा ब्रम्हे हिने सादरीकरण केलेल्या संशोधन कार्यास प्रथम क्रमांक मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन पेपर सादरीकरणात प्रतीक्षाला प्रथम क्रमांक मिळाल्याने औषधी निर्माणशास्त्र विभागाला बहुमान प्राप्त झाला आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च – GLA युनिव्हर्सिटी, मथुरा येथे “केमिकल, बायोलॉजिकल आणि फार्मास्युटिकल सायन्सेसमधील नवकल्पना” या विषयावरील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत ८०० पेक्षा अधिक संशोधक सहभागी झाले होते. यामध्ये “3D बायोप्रिंटिंगसाठी पॉलीमेरिक बायोमटेरियल हायड्रोजेलचा विकास आणि मूल्यमापन” या विषयावर प्रतीक्षाने संशोधन पेपर सादर करीत अव्वल क्रमांक प्राप्त केला.
प्रतीक्षाने संशोधनकार्य प्रा डॉ प्रफुल्ल एम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत ८०० पेक्षा अधिक संशोधक विद्वानांनी रासायनिक, जैविक आणि औषधी विज्ञान क्षेत्रातील संशोधन कार्याचे सादरीकरण केले. थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानावरील तिचे संशोधन हे औषध विज्ञान विषयातील नाविन्यपूर्ण संशोधन आहे. तिने तिच्या यशाचे श्रेय विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रशांत पुराणिक, संशोधन मार्गदर्शक डॉ प्रफुल्ल साबळे, डॉ प्रमोद खेडेकर आणि तिच्या पालकांना दिले आहे. प्रतीक्षाचे 3D बायोप्रिंटिंग तंत्रज्ञान संशोधनावर आधारित दोन संशोधन लेख नुकतेच अत्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे.