सोलापूर विद्यापीठात डिफेक्स आयडिया स्पर्धेत १७४ संघ आणि एक हजार विद्यार्थ्यांनी केले विविध प्रकल्पांचे सादरीकरण
‘एबीव्हीपी’कडून आयोजित विभागीय स्पर्धेला प्रतिसाद
सोलापूर : देशातील विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरावरील डिफेक्ट: 2025 स्पर्धेचा सोलापूर विभागीय आयडिया प्रेझेंटेशन राऊंड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सोमवारी पार पडला. यामध्ये 174 हून अधिक संघ आणि एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन सेंटरच्या सहकाऱ्याने सदरील स्पर्धा पार पडल्या.






अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी, पर्यावरण, ऊर्जा, आरोग्य, औद्योगिक विकास, समाजोपयोगी संशोधन आणि स्टार्टअप यासारख्या विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण आणि सृजनशील कल्पना विद्यार्थ्यांनी सादर केल्या. यातील काही प्रकल्प सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाय शोधणारे होते, तर काही संकल्पना उद्योजकतेला चालना देणाऱ्या होत्या. कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, डिफेक्स स्पर्धेचे संयोजक संकल्प फळदेसाई, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, इनोव्हेशन आणि लिंकजेसचे संचालक प्रा. विकास पाटील, डिपेक्सच्या दिपिका गिलबिले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. दामा म्हणाले की, प्रत्येक युवक उद्योजक झाला पाहिजे, त्यासाठी जे काही प्रयत्न लागतील ते करण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना नेहमीच विद्यापीठ प्रोत्साहन देईल, असेही ते यावेळी म्हणाले. संकल्प फळदेसाई म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांना संशोधन, स्टार्टअप आणि उद्योजकता यासाठी प्रेरित करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि देशाच्या विकासात त्यांचे योगदान वाढवणे, यासाठी डिफेक्स स्पर्धेचे आयोजन केले जाते, असे सांगितले.
आता या स्पर्धेतील निवडक संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरल्या असून, त्यांना अंतिम फेरीपूर्वी विशेष मार्गदर्शन सत्रे दिली जाणार आहेत. सोलापूर विभागात सादर झालेल्या अनेक संकल्पना नवउद्योजकतेला चालना देणाऱ्या आणि ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ या सारख्या राष्ट्रीय अभियानांना बळकटी देणार आहेत.