राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला संशोधनासाठी डीएसटीचे ११.४२ कोटींचे अनुदान
संशोधनातून नवीन स्टार्टअप करण्यास होईल मदत
नागपूर : भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (DST) वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला संशोधनासाठी तब्बल ११.४२ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. विद्यापीठ संशोधन आणि उत्कृष्ट वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत डीएसटीने हे अनुदान मंजूर केले आहे. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आधुनिक आणि उच्च प्रतीच्या उपकरणांद्वारे संशोधन तसेच नवीन स्टार्टअप करण्यास मदत मिळणार आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा (DST) ने मार्च २०२४ मध्ये विविध विद्यापीठांमधून संशोधन प्रस्ताव आमंत्रित केले होते. या अंतर्गत विद्यापीठातून प्रस्ताव सादर करण्यासाठी तत्कालीन माननीय कुलगुरू आणि तत्कालीन आयआयएल संचालक डॉ राजेश सिंह यांच्यासोबत एक प्रकल्प कार्यान्वयन समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्ष प्रा सुभाष कोंडावार (भौतिकशास्त्र) होते, प्रमुख संशोधक प्रा रविन जुगादे (रसायनशास्त्र), सहसंशोधक म्हणून प्रा उमेश पलिकुंडवार (भौतिकशास्त्र), डॉ राजेश उगले (औषधी निर्माणशास्त्र) तर सदस्यांमध्ये डॉ विजय तांगडे (रसायनशास्त्र), डॉ सत्येंद्र प्रसाद (औषधी निर्माणशास्त्र) आणि डॉ दादासाहेब कोकरे (औषधी निर्माणशास्त्र) यांचा समावेश होता.
योजने अंतर्गत प्रस्ताव डीएसटी (DST) कडे सादर करण्यात आला. या प्रकल्पाला तज्ज्ञ समितीतून प्रारंभिक मान्यता मिळाली आणि विद्यापीठाच्या समिती सदस्यांना २८ ऑगस्ट रोजी आयआयटी (IIT) नवी दिल्ली येथे प्रेझेंटेशनसाठी बोलविण्यात आले. प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समितीने १५ तज्ज्ञांचा समावेश असलेल्या डीएसटी प्रोग्राम मॅनेजमेंट बोर्डासमोर संशोधन प्रस्तावाचे सादरीकरण केले. समितीकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचे डीएसटीच्या सदस्यांनी कौतुक केले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला २५ ऑक्टोबर २०२४ रोजी अनुदान मंजूर करण्यात आल्याचे पत्र पाठविले.
मंजूर केलेल्या रकमे अंतर्गत ८.०० कोटी रुपयांचे वैज्ञानिक उपकरणे, ५ संशोधन विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प फेलोशिप आणि चार वर्षांच्या कालावधीत आवश्यक इतर उपसाधने आणि अनपेक्षित खर्चांचा यात समावेश आहे. पर्यावरण आणि आरोग्य या दोन्ही मानकांशी तडजोड न करता स्वच्छ ऊर्जा उपकरणाच्या निर्मितीसाठी नवीन साहित्याचा विकास यावर संशोधन प्रस्ताव आधारित असल्याचे प्रमुख संशोधक प्रा. रविन जुगादे यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत मिशनसाठी आवश्यक स्वच्छ ऊर्जा उपकरणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पर्यावरण पुनरुज्जीवन आणि स्वस्थ भारत मिशन अंतर्गत आवश्यक आरोग्यसामग्री निर्मिती आदी प्रकल्पाच्या तीन महत्त्वपूर्ण बाबी आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संशोधनाकरिता हा प्रकल्प अधिक गती देणारा ठरणारा आहे. सोबतच समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्या दृष्टीने संशोधन करीत साहित्य विकसित करण्यास मदत मिळणार आहे. विद्यापीठाने स्थापित केलेल्या इंक्यूबेशन सेंटर हे उद्योग आणि विद्यापीठ यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करीत आहे. याच इनक्युबेशन केंद्राच्या माध्यमातून नवीन साहित्य, तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. त्यामुळे नवीन स्टार्टअप सुरू होण्यास मदत मिळेल. या अनुदानातून उपलब्ध सर्व उपकरणांचा लाभ विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयातील सर्व संशोधकांना घेता येणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP-2020) अभ्यासक्रमानुसार संशोधन प्रकल्पांमध्ये उपयुक्त ठरणार आहे. विद्यापीठाने मागील शैक्षणिक सत्रापासूनच एनईपीनुसार अभ्यासक्रम लागू केले आहे
मंजूर केलेल्या रकमेचा एक भाग वैज्ञानिक सामाजिक जबाबदारी (एसएसआर) अंतर्गत देखील ठेवण्यात आला आहे. अनुदानातून प्राप्त उपकरणांचा विदर्भातील नवोदित संशोधकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी उपयोग होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून आतापर्यंत मिळालेले हे सर्वात मोठे अनुदान आहे. प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांनी संशोधन प्रस्ताव तयार करण्यासोबतच प्रेझेंटेशनदरम्यान प्रस्तावाचे प्रभावीपणे मांडणी केल्याने संपूर्ण समितीचे कौतुक केले आहे. कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी सर्व कार्यालयीन सहकारी तसेच समितीचे अभिनंदन केले आहे. सोबतच योजनेच्या तातडीने अंमलबजावणीसाठी प्रशासकीय मदत करणार असल्याचे सांगितले.