प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ध्वजारोहण
“उच्च ज्ञानदानाचे कार्य करावे” – कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर
नागपूर |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भारतीय ७७व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साह व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी जमनालाल बजाज प्रशासकीय भवनासमोरील हिरवळीवर हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
कार्यक्रमाला संबोधित करताना कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर म्हणाल्या की, दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या या विद्यापीठात प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. सर्वांनी एकत्रितपणे परिश्रम घेत विद्यापीठाचा नावलौकिक वाढविला असून, भविष्यातही उच्च ज्ञानदानाचे कार्य सातत्याने सुरू ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी श्री. हरीश पालीवाल, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेधा कानेटकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ, आयक्यूएसी संचालक डॉ. नंदकिशोर करडे, माजी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, आयआयएल संचालक डॉ. प्रकाश ईटणकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक डॉ. समित माहोरे, यांच्यासह पदव्युत्तर शैक्षणिक विभागांचे प्रमुख, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा सोहळा राष्ट्रीय एकात्मता, शैक्षणिक उत्कृष्टता आणि संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करणारा ठरला.
