पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उद्योजकता विकास यात्रेचे उद्घाटन
देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उद्योजक घडवा – पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे
सोलापूर : देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी चांगले उद्योग आणि उद्योजक तयार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले.सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वावलंबी भारत अभियान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने राष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त आयोजित उद्योजकता विकास यात्रेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. गौतम कांबळे हे होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक जयेश पटेल, अभाविपचे प्रांत संघटनमंत्री अभिजीत पाटील, विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. सचिन लड्डा, स्वावलंबी भारत अभियानाचे जिल्हा समन्वयक विनायक बंकापूर, ओम इंगळे यांची उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षक सरदेशपांडे म्हणाले की, आज देशामध्ये उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. स्वावलंबी भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व उद्योजक निर्माण करण्यासाठी उद्योजकता विकास यात्रा निघणार आहे, यामधून चांगले उद्योजक तयार होतील, अशी अपेक्षा आहे. इस्रायल सारख्या कमी लोकसंख्येच्या देशाने स्टार्ट अप व उद्योगांमध्ये चांगली प्रगती केली आहे, तसे प्रयत्न भारतातील युवा वर्गाकडून होणे अपेक्षित आहे, असेही सरदेशपांडे म्हणाले.
प्र-कुलगुरु डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, 1991 मध्ये देशाने आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतात उद्योजकतेची संकल्पना रुजण्यास सुरुवात झाली. उद्योगामुळे समाज व पर्यायाने देशाला फायदा होतो. देशाच्या अर्थव्यवस्थेला या माध्यमातून गती मिळते. आज राज्य व केंद्र सरकारने देखील उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी व स्टार्टअप सुरू करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरने देखील यामध्ये योगदान देत आहे, याचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला पाहिजे, असे आवाहन देखील प्र-कुलगुरू डॉ. कांबळे यांनी केले. पटेल म्हणाले, नैतिकता अन् चिकाटी ठेवल्यास उद्योग व व्यवसायात यश निश्चित मिळते. उद्योजक बनण्यासाठी घरातून पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. नवा उद्योग सुरु करताना संबंधित बाबींची चाचपणी करणे आवश्यक आहे. व्यवसाय करण्यासाठी प्रामाणिकता देखील खूप महत्त्वाची असते, असे ही ते म्हणाले. अभिजीत पाटील यांनी यावेळी रोजगारयुक्त समाज व देश घडावा आणि ग्रामीण भागातील युवा वर्गाच्या कल्पनाशक्तीला व उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने स्वावलंबी भारत अभियानाच्या माध्यमातून उद्योजकता विकास यात्रा काढण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. सचिन लड्डा यांनी विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या उद्योग पूरक उपक्रमांची माहिती दिली. सिनेट सदस्य चन्नवीर बंकुर यांनीही यावेळी स्वावलंबी भारत अभियानाची संकल्पना स्पष्ट केली. 2 सप्टेंबर 2023 पर्यंत शहर व जिल्ह्यात ही यात्रा फिरणार आहे. प्रास्ताविक विनायक बंकापुर यांनी केले. ज्ञानेश्वर जाधव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य मुस्के यांनी केले तर आभार ओम इंगळे यांनी मानले.