कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २२ जुलै रोजी G-20 युवा संवाद भारत@2047 संमेलन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शनिवार दि. २२ जुलै रोजी G-20 युवा संवाद भारत@2047 संमेलन आयोजित करण्यात आले आहे. भारतात G-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने देशातील प्रमुख शहरांमध्ये शिक्षण, पर्यटन, महिला विकास, आर्थिक विकास अशा विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करण्यात येत असून त्यासाठी कार्यगट गठीत करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत युवकांचा संवाद महत्वाचा असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात G-20 युवा संवाद भारत@2047 संमेलन होत आहे. भारत सरकारचे युवक व क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या तिनही जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयातील १५०० विद्यार्थी या संमेलनात सहभागी होणार असून बुधवार पर्यंत १२०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. प्रत्येक महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी १५ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात देशातील नागरिकांना पंचप्रण (संकल्प) दिले आहेत. त्यामध्ये विकसित भारताचे ध्येय, गुलामगिरी किंवा वसाहतवादी मानसिकतेची चिन्हे काढून टाकणे, तेजस्वी वारशाचा अभिमान बाळगणे, एकतेचे सामर्थ्य आणि नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना रूजविणे यांचा समावेश आहे. या संमेलनात २५ निवडक विद्यार्थ्यांना अमृत काळातील पंचप्रण यावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे. शनिवार दि. २२ रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रामविकास मंत्री श्री. गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी असतील तर खा. रक्षा खडसे व आ. मंगेश चव्हाण हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे यांचे बीजभाषण होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, रा.से.यो. चे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकीयेन, राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. दुपारी विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. केशवस्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष भरत अमळकर या सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. संध्याकाळी ४.०० वाजता पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत व कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. यावेळी खा. उन्मेष पाटील, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे यांची यावेळी उपस्थिती असेल. या संमेलनासाठी १५ विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. संमेलनाचे समन्वयक व्यवस्थापन परिषद सदस्य अॅङ अमोल पाटील आहेत. या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. विनोद पाटील, समन्वयक अॅङ अमोल पाटील, रा.से.यो. चे संचालक डॉ. सचिन नांद्रे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जे.डी. लेकुरवाळे यांनी केले आहे.